पन्नास हजाराहून अधिक बहुभाषिक पुस्तकांचे सजलेले दालन
डोंबिवली(वार्ताहर)
सोशल मिडीयानं तरुणाचं विश्व व्यापलं आहे. त्याचा परिणाम भाषेवर झाला आहे. भाषा, संस्कृती टिकवायची असेल तर पुस्तकांचे वाचन झाले पाहिजे. तरुण पिढीला पुस्तक वाचायला शिकवलं पाहिजे, जेव्हा वाचन संस्कृती वाढेल तेव्हाच माणसाचे आयुष्य समृद्ध होईल, या सर्वासाठी पुस्तक आदान प्रदान सारखे उपक्रम हे उत्तम माध्यम आहे. डोंबिवलीत पै फ्रेण्डस लायब्ररीच्या पुढाकारानं भरलेला पुस्तक मेळा हा कौतुकास्पद आहे. याचे अनुकरण व्हावे, असे आवाहन प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले यांनी केले. तब्बल पन्नास हजाराहून अधिक बहुभाषिक पुस्तकांचे सजलेले दालन पाहून आयोजकांचे कौतुक केले.
डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलावर पै फ्रेण्डस लायब्ररीच्या पुढाकारानं बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यासाठी उभारण्यात आलेल्या एपीजे अब्दुल कलाम नगरीतील या भारतातील पहिल्या बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जेष्ठ लेखक अच्युत गोडबोले बोलत होते. या सोहळ्याची संकल्पना मांडणारे आणि ती संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी झटणारे पै फेण्डस लायब्ररीचे पुंडलिक पै यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच इतर भाषांमधली पुस्तके आपल्या भाषेत आली पाहिजेत. यासाठी भाषेमध्ये संशोधन होण्याची गरज असल्याचे मतही गोडबोले यांनी व्यक्त केले.
या सोहळ्याची सुरुवात दिपप्रज्वलानं झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, जेष्ठ अनुवादिका उमा कुलकर्णी, विश्वकर्मा प्रकाशनाचे विशाल सोनी, राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर, आ. राजू पाटील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मान्यवरांनी पुस्तक आदान प्रदान प्रदर्शनाचे उद्घाटन केले. तब्बल पन्नास हजाराहून अधिक बहुभाषिक पुस्तकांचे सजलेले दालन पाहून त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी अशा उपक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थानी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरांमध्ये सोयी सुविधा पुरवण्याबरोबरच त्या शहराची सांस्कृतिक भूक भागवण्याची जबाबदारीही स्थानिक स्वराज्य संस्थाची असते, त्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले. पै फ्रेण्डस लायब्ररीच्या माध्यमातून राबवण्यात येणा-या विविध उपक्रमांचाही उल्लेख करत त्यांनी त्या उपक्रमांचे कौतुक केले.
राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर यांनी सोशल मिडीयावर तरुणांचा वेळ वाया जात असल्याची खंत व्यक्त केली.सोशल मिडीयामुळे वाचनाची संस्कृतीच बदलली असली तरी आजही साहित्य संमेलनात पुस्तकांची होणारी विक्री हा एक आशेचा किरण आहे. तरुणांनी पुस्तकं विकत घेऊन वाचण्याची गरज आहे. सोशल मिडीयातील संकुचित संस्कृतीतून बाहेर पडण्यासाठी पुस्तकांच्या वाचनावर भर द्यायला हवा. त्यासाठी अशाच पुस्तक आदान प्रदान प्रदर्शनाचा उपयोग होणार असल्याचे निरगुडकर यांनी सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करतांना आ. राजू पाटील यांनी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी करण्यासाठी अशा प्रकारचा पुस्तक आदान प्रदानचा उपक्रम उपयोगी असल्याचे सांगितले. तरुणांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. विश्वकर्मा प्रकाशनचे विशाल सोनी यांनी आदान प्रदान प्रदर्शनाला साहित्य संमेलनाचा दर्जा द्यावा असे आवाहन केले. ज्येष्ठ अनुवादिका उषा कुलकर्णी यांनी या बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान प्रदर्शनाचे स्वरुप अधिक व्यापक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या सोहळ्यात बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान प्रदर्शनानिमित्त प्रकाशित केलेल्या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. यात साठ मान्यवरांचे लेख असून या पुस्तकाचे संपादन योगेश जोशी यांनी केले आहे. एपीजे अब्दुल कलाम नगरीत झालेल्या या शानदार सोहळ्याची सुरुवात एकलव्य आर्ट फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यानं झाली. सुखदा भावे दाबके यांनी या सोहळ्यावर गीत तयार केले आहे. त्या गितावरही विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केला. या नगरीमध्ये पुस्तकांचा इग्लू, खुर्ची, सोफा यांची उभारणी केली आहे, शिवाय पुस्तकांचे भव्य असे प्रवेशद्वारही तयार केले आहे. यासाठी सिद्धेश बागवे आणि सभागृहासमोर पुस्तकांची रांगोळी साकारणा-या उमेश पांचाळ यांचेही कौतुक मान्यवरांनी केले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अनुया धारप आणि अनिकेत घमंडी यांनी केले. प्रस्तावना पै फ्रेण्डस लायब्ररीचे संस्थापक पुंडलिक पै यांनी केली. वृंदा भुस्कुटे यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाला डोंबिलीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार जगन्नाथ पाटील, प्रभाकर भिडे, मनोज मेहता, विवेक पंडित सर, जेष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, नंदू जोशी, निलेश बागवे, धनश्री साने, अर्चना परुळेकर, ज्योती दाते, प्रुभू कापसे, दिपाली काळे, विद्याधर भुस्कुटे, मिना गोडखिंडी, दर्शना सामंत, हेमंत नेहते, जयश्री कर्वे, प्रा. विनय भोळे, सुनिला पोतदार, अल्काताई मुतालिक, मितेश पेणकर, रोहिणी लोकरे, प्रविण दुधे, आरती मुनीश्वर, माधव जोशी, राजन मराठे, भुषण पत्की, ललिता छेडा, सचिन चोगले, उमा आवटे पुजारी, विश्वनाथ बिवलकर, कौस्तुभ लेले आदी मान्यवर उपस्थित होते.
डोंबिवलीतील सावळाराम बंदिस्त क्रीडासंकुलात हा बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान सोहळा 29 जानेवारीपर्यंत होणार आहे. यामध्ये अवघे दहा रुपये शुल्क देऊन आपल्या घरातील वाचून झालेले पुस्तक बदलता येणार आहे. या दालनात तब्बल पन्नास हजाराहून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. याशिवाय नविन पुस्तकांची विक्रीही करण्यात येत आहे. विशेष म्हणजे डोंबिवलीतील लेखकांचे विशेष दालन येथे उभारले आहे. या सर्वाबरोबर रोज सायंकाळी 6 ते 8 य वेळेत अनेक दर्जदार कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. या सर्वांचा लाभ घ्यावा आणि प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment