अखेर प्रथमेश ज्वेलर्सचा मालक अजित कोठारीला अटकपूर्व जामीन मंजूर
डोंबिवली : ( शंकर जाधव )
ग्राहक व गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या प्रथमेश ज्वेलर्सचा मालक अजित कोठारी याचा अटकपूर्व जामीन अर्ज कल्याण न्यायालयाने मंजूर केला आहे. यासंदर्भात गुन्ह्याचे तपास अधिकारी रामनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण जाधव यांनी दिली. कोठारी याला जामीन मंजूर करताना काही अटी व शर्ती देण्यात आल्या आहेत.
या गुन्ह्याचा तपास अधिकारी सुनील वाघ याला याच प्रकरणात तक्रारदाराकडून लाच मागितल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. त्यामुळे पवार यांनी तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण जाधव यांच्याकडे दिला आहे. कोठारी याने ग्राहकांना जागा, सोन्यामध्ये तसेच गुंतवणुकीच्या पैशांवर अधिक परतावा देण्याचे प्रलोभन दाखवले होते. फसवणुकीचा आकडा कोट्यवधींच्या घरात असल्याचे तक्रारदारांकडून मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. त्याआधारे त्याच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा कोठारी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्याचा शोध सुरू होता. त्याचे बंद असलेले घर, दुकान, तसेच नातेवाइक यांच्याकडेही तपास करण्यात येत होता. दोन पथकांमधील पोलीस कर्मचारी या कामात गुंतले होते. त्याचे दुकान सील करण्यासंदर्भातही आदेश मिळविण्यात आले. मात्र याच दरम्यान कोठारी याने कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्यानुसार अनेक अटी व शर्तींवर त्याला जामीन देण्यात आला. शहर सोडून त्याला जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तपास अधिकारी जेव्हा बोलावतील तेव्हा त्याने पोलिस ठाण्यात हजर व्यायचे आहे. त्यानुसार आरोपी कोठारी हा तपासाला सहकार्य करत असल्याचे पोनि नारायण जाधव यांनी सांगितले. दरम्यान वाघ याच्या अटकेमुळे तपास अधिकारीही बदलण्यात आला. या प्रकरणाच्या तपासाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष आहे. कोठारीला अटक करून फसवणूक झालेल्यांना त्यांचा मुद्देमाल मिळवून देण्याचा दृष्टीने तपास सुरू असल्याचे वपोनि विजयसिंह पवार म्हणाले.

Post a Comment