ठाणे जिल्हा साहसी क्रीडा असोसिएशन आणि सिद्धिविनायक युवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने
कलावंती दुर्ग ट्रेकिंग व स्वच्छता अभियान
टिटवाळा : पावसाळा सुरू झाला की देशभरातील गिरीप्रेमी ट्रेकर्स व गिर्यारोहक ना वेध लावणारे विविध किल्ले व धबधबे स्वःताच्या अफाट निसर्ग सौंदर्याने अक्षरशः ओढ लावत असतात. अनेक ट्रेकर्स निवडक व चढाई करायला सोपे असणारे किल्ले निवडतात. तर काहीजण अवघड व दुर्मिळ किल्ले सर करण्याकडे वळतात. पण सध्या काही ट्रेकर्स किल्यावर केवळ मजा मस्ती करायला जाताना आपल्याला दिसतात. त्यांच्या मस्ती मुळे किल्ल्यांवर ट्रेकिंग करताना दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. परंतु युवा पिढीला योग्य मार्गदर्शन देऊन ट्रेकिंग चे सर्व नियम पाळून युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती मिळवुन देण्याचा प्रयत्न टिटवाळा येथील सिद्धिविनायक युवा संस्था नित्यनेमाने करीत आहे.
रायगड जिल्ह्यातील अतिशय थरारक दुर्गाच्या यादीतील एक कलावंती नावाचा दुर्ग सध्या भारतीय वन विभागाच्या अखत्यारीत आहे. महागणपतीचे निवासस्थान श्री क्षेत्र टिटवाळा या छोट्याश्या शहरापासून अवघ्या 70 किमी अंतरावर असलेल्या कलावंती दुर्गावर नुकतेच ठाणे जिल्हा साहसी क्रीडा असोसिएशन आणि सिद्धिविनायक युवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने, कलावंती दुर्ग ट्रेकिंग व स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. राज्याच्या साधन संपत्ती चे जतन व संवर्धन उपक्रम अंतर्गत दरवर्षी संस्थेच्या वतीने विविध किल्ल्यांवर ट्रेकिंग व स्वच्छता अभियान राबविण्यात येते.
चढायला अतिशय अवघड अश्या या कलावंती दुर्गा वर ट्रेकिंग व स्वच्छता अभियान उपक्रम राबविण्यासाठी टिटवाळा, वासींद, कल्याण, डोंबिवली,मुंब्रा, ठाणे, नालासोपारा या विविध विभागातून २८ युवक व युवती सहभागी झाले होते. राज्य युवा पुरस्कार विजेते व या उपक्रमाचे प्रमुख विनायक कोळी यांनी विविध किल्ल्यांवर ट्रेकिंग करताना काय काळजी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन केले. क्रीडा प्रशिक्षक व अनुभवी ट्रेकर हरीष वायदंडे व संतोष मुंढे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपूर्ण ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. त्याच प्रमाणे सहाय्यक मार्गदर्शक गणेश गायकवाड व साहिल कातडे यांनी सर्व ट्रेकर्स ना कलावंतीच्या सुळक्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रोत्साहित केले.

Post a Comment