इमारतीतील लिफ्ट आठवडाभर बंद..
महिलेचा रक्तदाब वाढल्याने पायरीवरून पडून जागीच मृत्यू....   
टाटा अमंत्रा येथील घटना..  

 डोंबिवली :-  ( शंकर जाधव  ) कल्याण- भिवंडी बायपास रोडवर असणाऱ्या टाटा अमंत्रा या नवीन इमारतीतील नागरिकांना टाटा ग्रुपने इमारत बांधताना दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. २८ ते ३० जुलै रोजी कोसळणाऱ्या पावसामुळे या इमारतीत पाणी भरले होते. त्यानंतर या इमारतीतील उद्वाहिनी जवळपास आठडाभर बंद होती. परिसरात वीज नसल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. या गोंधळात एका रहिवाशी महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. उद्वाहिनी बंद असल्याने डॉक्टरकडे तपासणीसाठी गेलेली महिला घराकडे परतत असताना त्यांना जिन्यावरून चढून जावे लागले. याचवेळी रक्तदाब वाढल्याने ती जिन्यावरून पडली आणि तिच्या मेंदुला दुखापत झाल्याने आईचा मृत्यू झाला असा आरोप त्यांचा मुलगा सोहेल यांनी केला आहे. अनेकजण रोज २० -२० मजले चढ-उतार करून जात असून एखाद्याला ह्दयविकाराचा झटका आला तर टाटा व्यावसायिक जबाबदारी घेणार का असा सवालही संतप्त रहिवाशांनी विचारला होता. त्यामुळे इमारत खरेदी करताना स्वप्न दाखविलेल्या बांधकाम व्यवसायिकाने इमारतीचे बांधकाम कायद्याच्या चौकटीत राहून केले नसल्याने त्रास होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

  मैमुना पारकर (६४) असे या महिलेचे नाव असून टाटा अमंत्रा येथील अरूनम या सोसायटीत सी विंग येथे पाचव्या मजल्यावर रहात होत्या. या इमारतीत असुविधाच अधिक असल्याने जवळपास आठवडाभर उद्वाहिनी बंद होती. त्यामुळे डॉक्टरकडे तपासणी करण्यासाठी जाण्यास आठवडाभर विलंब झाल्याची माहिती सोहेल यांनी दिली. शनिवारी उद्वाहिनी सुरू असल्याचे पाहताच सोहेल यांनी आपल्या आईला तपासणीसाठी मुंबई येथील माझगाव डॉक परिसरात राहणाऱ्या डॉक्टरकडे नेले होते. मात्र रात्री परतताना उद्वाहिनी पुन्हा बंद होती. उद्वाहिनी बंद असल्याची कोणतीही सुचना वॉचमन किंवा व्यवस्थापकांकडून देण्यात आली नव्हती अशी माहिती सोहेल यांनी दिली. त्यामुळे रात्री इमारतीत परतल्यानंतर उद्वाहिनी बंद असल्याचे समजले. त्यावेळी आपण पायऱ्या चढून जाऊ असे मैमुना याने सोहलला सांगितले. पायऱ्या चढताना रक्तदाब वाढल्याने त्या पडल्या आणि त्यांना मेंदुला दुखापत झाली. यावेळी सोसायटीच्या वॉचमनकडे मदत मागितली होती. मात्र त्यांच्याकडे स्टे्रचरवॉकर खुर्ची यासारखी कोणतीच साधन सामुग्रीसुध्दा उपलब्ध नव्हती.   
   या इमारतीत कधी वीज नाहीकधी सोसाटीत पावसांचे पाणी तुंबले आहे. कधी पिण्यासाठी पाणी नसल्याने इमारतीतील रहिवाशांनी टाटा अमंत्रा या इमारतीच्या जाहिरातीसाठी रस्त्यावर लावलेले फलक फाडून टाकल्याची घटना जुलै महिन्यात घडली होती. टाटा अमंत्रा या इमारतीत एकुण १२ विंग्स आहेत. काही विंगमध्ये २४ मजले असून काही विंग मध्ये २९ तर काही विंग्समध्ये ३४ मजले बांधले आहेत. संपूर्ण इमारतीत ५०० कुटुंब राहतात. इमारतीचे स्ट्रक्टर चुकीचे असल्यानेच पाणी तुंबले होते. पाणी जाण्यासाठी कोणतीही सोय केली नसल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात येत होते.  इमारतीच्या तळ मजल्यावर पाणी भरल्यामुळे उद् वाहिनी मध्ये पाणी भरून आठवडाभर उद्वाहिनी बंद होती. त्यामुळे अनेक रहिवाशी अडकले होते. विशेष म्हणजे अनेक वृध्द व्यक्तींना डॉक्टरकडे घेऊन जाणेही कठीण झाले होते. तळमजल्याला पाणी भरल्यामुळे रहिवाशांचा दुचाकी आणि चार चाकीचे नुकसान झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post