निलेश ठोंबे हे नाव अल्पावधीतच मोहने शहरांमध्ये प्रसिद्धीस आलेले एक नाव आहे या नावाने अनेक राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना, नेतेमंडळींना, समाजसेवकांना आपल्या कार्याची दखल घेण्यासाठी भाग पाडले आहे. कोरोना सारख्या महामारी मध्ये संपूर्ण वर्षभर आजही सर्वाधिक अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप करणारा सर्वांना परिचित आहे. याच नावाने गोरगरीब, आदिवासी, अपंग, निराधार विधवा महिला व आदिवासी समाजामध्ये आपुलकीचं नातं निर्माण केलं.
ते नाव म्हणजे निलेश भिमराव ठोंबे ज्याने समाजातील प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे.....
२० जुलै त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्याचा घेतलेला हा अल्प परिचय.....
निलेश भिमराव ठोंबे यांचा जन्म रघु हिवरेगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे २० जुलै १९८२ रोजी झाला. वडील भीमराव रामभाऊ ठोंबे यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गाव सोडले आणि मोहने येथे राहावयास आले. त्यांनी मुंबई येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करून आपले कुटुंब सांभाळले. आई चंद्रकला भीमराव ठोंबे या गृहणी असून त्यांनी आपल्या मुलाला समाजसेवा करण्यासाठी कधीही रोखले नाही या उलट त्यांना पाठिंबाच दिला आहे. कुटुंबाची साथ असल्यामुळेच निलेश हे जास्तीत जास्त समाजसेवेसाठी वेळ देतात हे प्रामुख्याने नमूद करावे लागेल. निलेश यांचे प्राथमिक शिक्षण गाळेगाव येथील सिद्धार्थ प्राथमिक माध्यमिक विद्यालय येथे झाले असून पदवीत्तर शिक्षण अहमदनगर महाविद्यालयात झाले आहे. त्यांनी आयटीआय तंत्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून कला शाखेत बी.ए पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सध्या ते मुंबई येथे खाजगी कंपनीमध्ये नोकरी करीत असून उरलेला वेळ समाजकार्यासाठी देतात.
निलेश यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, मितभाषी, हसतमुख व सर्वांना सांभाळून घेणारा व आपुलकीने विचारपूस करणारा उदात्त व प्रत्येकाला मदत करणारा आहे. ते निर्व्यसनी असून त्यांचा विवाह २८ डिसेंबर २००९ साली लीना ठोंबे (पाटोळे) यांच्यासोबत झाला.
बोलतात ना प्रत्येक कर्तुत्ववान पुरुषांमागे जसा एका महिलेचा हात असतो तसाच हात पत्नी लीना पाटोळे यांनी आपल्या पतीच्या पाठीशी ठेवलेला आहे. पतीच्या प्रत्येक कार्यात त्या हिरीरीने सहभागी होतात. त्यांच्या समाजसेवेच्या कार्यात त्यांना आनंदाने मदत करतात. या पती-पत्नीने मुंबई येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथे जाऊन गोरगरीब, अंध, अपंग, आदिवासी, निराधार महिला, विधवा महिला, आदिवासी समाज यांच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकासासाठी आजीवनभर सामाजिक कार्य करण्याची प्रतिज्ञा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना साक्ष ठेवून घेतली आहे. पती-पत्नीने जणू सामाजिक कार्यासाठी वाहूनच घेतले आहे असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही.
निलेश ठोंबे यांनी सुरुवातीला आपल्या जवळील मित्रमंडळींचा तसेच गोरगरिबांचा त्यांच्या घरी जाऊन वाढदिवस साजरा करण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला. गोरगरिबांना कसला आलाय वाढदिवस रोजचा दिवस आला तसा ढकलायचा, कोण आपला वाढदिवस साजरा करणार आणि वाढदिवसासाठी एवढा खर्च कोण करणार ही बाब लक्षात घेऊन निलेश ठोंबे यांनी आपल्या स्वखर्चाने केक विकत घेऊन वाढदिवस असलेल्या व्यक्तीच्या घरी जातात त्याच्या कुटुंबासमवेत आनंदाने केक कापून मित्राला गोड घास भरवितात. त्यावेळी संपूर्ण परिवाराच्या चेहऱ्यावर गोड हास्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
कोणी आजारी व्यक्ती आहे असे समजल्यावर निलेश हे त्या आजारी व्यक्तीला भेटण्यासाठी काही फळे, नारळ पाणी घेऊन जातात. आजारी व्यक्तीची आपुलकीने विचारपूस करतात काही मदत लागल्यास सांगा मी तुम्हाला सर्व काही मदत करील हा विश्वास देतात. त्यामुळे समाजातील गोरगरीब लोकांना निलेश यांचा मोठा आधार वाटतो.
सामाजिक कार्याला राजकारणाची जोड देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि मा.प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेतला. समाजामध्ये बहुजन विचारधारा रुजविण्यासाठी गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकारणाच्या माध्यमातून उपेक्षीत घटकाला न्याय देण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय काम करीत आहेत.
इतर समाजापेक्षा आदिवासी समाज अत्यंत मागासलेला आहे तो आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागे आहे .या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता आपण काहीतरी ठोस कार्य करायला पाहिजे. या जाणिवेतून ठोंबे यांनी दिव्य सेवाभावी संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी मुलांकरिता ज्ञानदा पूर्व प्राथमिक शाळा सुरु केली आहे. या शाळेच्या माध्यमातून गोरगरीब आदिवासी मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाते. या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून मुलांमधील कौशल्य गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. आदिवासी मुलांमध्ये अनेक कौशल्य गुण आहेत त्यांच्यामध्ये क्रीडा गुण आहेत निरीक्षण क्षमता मोठ्या प्रमाणात आढळून येते. आदिवासी मुलांना कला शिक्षणावर भर देऊन रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाते आदिवासी मुलांनी इतर मुलांप्रमाणे मुख्य प्रवाहाबरोबर यावे याकरिता ते सातत्याने प्रयत्न करीत असतात.
मोहने परिसरातील इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन शिबिर, दहावीनंतर पुढे काय ? या विषयावर मार्गदर्शन शिबीर भरविणे, चित्रकला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, किल्ले दर्शन व किल्ले संवर्धन स्पर्धा, उत्कृष्ट किल्ला बांधणी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, आदी प्रकारच्या स्पर्धा सातत्याने घेत असतात.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाबाई आंबेडकर, माता सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ व छत्रपती शाहू महाराज या महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करून महापुरुषांचे विचार तळागाळातील समाजापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम ते सातत्याने करीत आहेत. महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी त्यांना रोजगार मिळावा याकरिता रोजगार मार्गदर्शन शिबिरे भरविणे महिला मेळावे आयोजित करणे तसेच महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून वडापावची गाडी सुरु करण्यासाठी ठोंबे यांनी वेळ प्रसंगी स्वखर्चातून आर्थिक मदत केली आहे.
समाजसेवा करीत असताना लोकांना अन्नधान्य रेशन किट वाटप करीत असताना कोरोना विषाणूने ठोंबे यांनाही सोडले नाही. निलेश ठोंबे आणि त्यांची पत्नी लीना ठोंबे (पाटोळे) या दाम्पत्यांना कोरोना आपल्या विळख्यात घेतले. त्या दाम्पत्यांना १४ दिवस कोरनटाईन व्हावे लागले. उपचार सुरू झाले. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या या समाजसेवकास कोरोनाने काही होऊ नये म्हणून समाजातील प्रत्येक नागरिकाने आपल्या देवा समोर मोठ्या श्रद्धेने प्रार्थना केली. निलेश ठोंबे आणि त्यांची पत्नी लीना ठोंबे या लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून प्रत्येकजण दररोज त्यांना फोन करून त्यांची विचारपूस करत होते. चौदा दिवसांचा तो काळ संपला.
या लढवय्या समाजसेवकाच्या समाजसेवेच्या व्रतापुढे कोरोना सारख्या विषाणूला हार पत्करावी लागली आणि हे दांपत्य सुखरूप कोरोना आजारातून बरे झाले लोकांच्या आशीर्वादामुळेच मी कोरोनासारखे जीवघेण्या आजारातून बरा होऊ शकलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कोरोना सारख्या भीषण जीवघेण्या आजारातूनतून बरे झाल्यानंतरही त्यांनी आपली समाजसेवा थांबविली नाही किंवा समाजसेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही ते आजही समाजसेवा करीत आहेत अनेक गोरगरिबांना मदत करीत आहेत. त्यांच्या समाजसेवेला उत्तुंग यश प्राप्त हो हीच ही सदिच्छा......
निलेश ठोंबे यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
शब्दांकन : संदीप शेंडगे (पत्रकार)


Post a Comment