(मुंबई डेटलाईन 24 कल्याण -डोंबिवली - टिटवाळा टीम ) :
भारतभर पुकारण्यात आलेल्या इंधन दरवाढीविरोधात ‘भारत बंद’ला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . सकाळी १० वाजल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसेतर्फे कल्याण परिसरा बंदचे आवाहन करण्यात आले त्यानंतर दुकानदारांनी स्वतःहूनच या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश मुथा यांच्या नेतृत्त्वाखाली कल्याणमधील शिवाजी महाराज चौकात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देत निदर्शने केली. तर काही वेळासाठी या चौकात ठिय्या मांडत रास्ता रोको देखील करण्यात आले.
कॉंग्रेस आणि राष्टवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकातून मोर्चाची सुरुवात करत बैलगाडी, टांगे व दुचाकीस्वार यांसह बैल बाजार मार्गे मोहल्ला परिसरात जात पुन्हा शिवाजी चौक मार्गे आग्रा रोड, दुर्गाडी, आधारवाडी, खडकपाडा, बिर्ला कॉलेज, प्रेम ऑटो, सुभाष चौक मार्गे स्टेशन परिसरात तहसीलदार कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. यावेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रिक्षा युनियन, व्यापारी असोसिएशन, ज्वेलर्स असोसिएशन आदींच्या शिष्ट मंडळाने तहसीलदार अमित सानप यांची भेट घेत त्यांना इंधनदरवाढ कमी करण्याबाबतचे निवेदन सादर केले.
मोदी सरकारनी दिलेली आश्वासनं ही फोल ठरली असून त्यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता त्यांनी सत्तेत आल्यानंतर केलेली नसून, दरदिवशी इंधनाची दरवाढ होत आहे.यामुळे सर्व सामन्यांनाचे कंबरडे मोडले आहे. याच्या निषेधार्थ आम्ही कल्याण बंद ठेवण्याचा निर्णय सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत घेतला असून या बंदला कल्याणकर नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश मुथा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
डोंबिवली शहरात झालेल्या आंदोलनात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय कम्युनीट पक्ष ( माक्सर्वादी ), बहुजन समाज पार्टी यांनी जोरदार निदर्शने केली.मनसेने बैलगाडीतून मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध केला. तर बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांनी हे सरकार डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेची भाजप सरकार पायमल्ली करत आहे असे यावेळी सांगितले.पुकारलेल्या बंदला डोंबिवलीत उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तर कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागासह टिटवाळा शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला. काही ठिकाणी दुकाने बंद होती तर काही ठिकाणी सुरू. रिक्षा वाहतूक देखील काही प्रमाणात सुरू होती. तसेच येथील शाळा काॅलेजेस देखील सुरळीत सुरू होते. रस्त्यावरील वाहनाची वाहतुक देखील रोजच्या प्रमाणात दिसून येत होती. यामुळे कल्याण ग्रामीणसह टिटवाळा शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला.




Post a Comment