मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवलीतील जुन्या इमारतीच्या  वाढीव चटई क्षेत्र मिळावे 
                कॉंग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
डोंबिवली  ( शंकर जाधव  ) कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील  ३० ते  ४५  वर्ष जुन्या असलेल्या  इमारतीना वाढीव चटई  क्षेत्र मिळावे अशी मागणीचे निवेदनाद्वारे  काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  करण्यात केली आहे.  कल्याण - डोंबिवली महापालिका अस्तित्वात येण्या अगोदर येथे ग्रामपंचायत राजवट होती.परिसरातील भूमीपुत्र शेतकरी बांधव शेती करुन उदर निर्वाह चालवित होता. सर्वसामान्यांना अल्पदरात व परवडणारी घरे मिळण्यासाठी भूमीपुत्रांनी  जमीनीचा त्याग करीत घरे उपलब्ध करुन दिली.शहराचा विकास व्हावा याकरिता आगरी कोळी भूमीपुत्रांनी आपल्या जमीनी विविध आरक्षणासाठी खुल्या मनाने दिल्या.   

      एमआयडीसी, डेडिकेट रेल्वे काँरिडाँर, रिगंरुट इत्यादि साठी जमीनी आरक्षित केल्यामुळे मुळचा आगरी कोळी भूमीपुत्र भुमीहीन झाला असून तो उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. महापालिका क्षेत्रातील महत्त्वाचा भेडसावणारा प्रश्न म्हणजे वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक -एफएसआय. ग्रामपंचायत काळापासून ते आज पर्यंत सुमारे तीस ते चाळीस वर्षात बांधलेल्या इमारती धोकादायक परिस्थितीत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका इमारत  बांधकामासाठी फक्त एक चटई क्षेत्र देते. तसेच जुन्या व धोकादायक बांधकामाना सध्याच्या अटी व शर्ती प्रमाणे जमीन मालक व यांना मोबदलाही मिळत नाही. व राहत्या रहिवाशांना घरेही देण्यात येत नाही. असाच प्रश्न मुंबई पालिकेत निर्माण झाला होता.त्याला उपाय म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री यांनी त्यांच्या गरजा समजून त्यांच्या इमारत बांंधणीसाठी चार चटई क्षेत्र मंजूर करून दिले व जमीन मालक व रहिवाशांचा प्रश्न सोडवला.त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात चार  वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक
मंजुरी मिळावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते संतोष केणे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post