फेरीवाल्यांचा माल जप्त मात्र दुकानदारांच्या मालाला पालिकेचे अभय  


डोंबिवली :-  ( शंकर  जाधव  ) स्टेशनबाहेर १० मीटर अंतरात बसणाऱ्या अनधिक फेरीवाल्यांवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या फेरीवाला हटाव पथक कारवाई करत आहे. त्यामुळे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त दिसत आहे. मात्र फेरीवाल्यांवर कारवाई करताना पालिका प्रशासन दुकानदारांनि फुटपाथ काबीज करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले. गुरुवारी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात कष्टकरी हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी `ग` प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. त्यावेळी `फ` प्रभाग क्षेत्राच्या हद्दीतील फुटपाथवरील दुकानदारांचा जप्त केलेला माल कर्मचारी सोडून देत होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्याचे फोटो काढून कुमावत यांना दाखवले. मात्र आपल्या  प्रभाग क्षेत्रातील हा माल नसल्याचे कुमावत यांनी सांगितले. यावरून पालिका प्रशासन फेरीवाल्यांचा माल जप्त करत असून दुसरीकडे मात्र दुकानदारांच्या मालाला अभय देत असल्याचे दिसून आले.

चार- पाच दिवसांपूर्वी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर फेरीवाल्यांनी धडक मोर्चा काढला होता. यावेळी फेरीवाला संघटनेच्या शिष्टमंडळांनी `ग` प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांची भेट घेऊन चर्चा केली होती. दोन चार दिवसांनी यावर उत्तर देतो असे कुमावत यांनी शिष्टमंडळांला सांगितले होते. गुरुवारी कष्टकरी हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांच्यासह पदाधिकारी आणि फेरीवाल्यांनी कुमावत यांची भेट घेतली. पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची वेळ घेऊन आपणास कळवितो असे उत्तर पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी पालिकेचे कर्मचारी दुकानदारांचा जप्त केलेला माल परत देत असल्याचे फोटो फेरीवाल्यांनी काढले आणि कुमावत यांना दाखविले.कुमावत यांनी याबाबत `फ` प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पवार यांना सांगितले असता यासंदर्भात माहिती नसून यापुढे दुकानदारांचा जप्त केलेला माल दुकानदारांना दिला जाणार नाही असे कुमावत यांना सांगितले. मात्र पालीकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई का केली नाही असा प्रश्न फेरीवाल्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात कष्टकरी हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष कांबळे यांना विचारले असता ते म्हणाले, फेरीवाल्यांना एक न्याय आणि दुकानदारांनां दुसरा न्याय ? हे कसे होऊ शकते.पालिका प्रशासन दुकानदारांच्या बाजूने असल्याचे यावरून दिसून येते.


आयुक्तांची तारीख मिळेना ...

स्टेशनबाहेरील १५० मीटरच्या आत बसल्यास कारवाई आणि १५० मीटरच्या बाहेर बसल्यास जेलची हवा अशी अवस्था फेरीवाल्यांची झाली आहे. पालिका  प्रशासने फेरीवाल्यांना १५० मीटरच्या बाहेर कुठेहि बसल्यास जागा दिल्यास तेथे फेरीवाल्यांनी बसण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी यावर निर्णय घ्यावी यासाठी फेरीवाला संघटना आयुक्तांना भेटण्यास तारीख मागत आहे. परंतु आयुक्तांना यासाठी तारीख मिळत नसल्याने फेरीवाल्यांच्या जागेचा प्रश्न अधांतरीत राहिला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post