डहाणू मध्ये तिरंगी लढत होणार
निलेश कासट - कार्यकारी संपादक
विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी डहाणू मतदार संघामध्ये बहुजन विकास आघाडी कडून सुरेश पाडवी यांनी उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केला. डहाणू मध्ये ही विधानसभा अतिशय चुरशी ठरणार आहे. डहाणू मतदार संघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा निवडणुकीचा थेट सामना रंगणार अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असताना शेवटच्या दिवशी या मध्ये बविआ ने सुद्धा उडली मारली आहे. पालघर जिल्ह्यात वसई, विरार, नालासोपारा, बोईसर आदी मोठ्या प्रमाणात नागरीकरण असणाऱ्या शहरात तसेच महानगरपालिकेत गेली अनेक वर्ष बहुजन विकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व आहे. या निवणुकीत कोणत्याही पक्षाला साथ न देता या विधानसभेमध्ये बविआ स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डहाणू व पालघर मध्ये बविआ ने आपले उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडी व महायुती यांना काटे की टक्कर देण्यासाठी बहुजन विकास आघाडी आता सज्ज झाली आहे.
डहाणू मतदार संघातून सुरेश पाडवी यांना उमेदवारी देत बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांना चांगलीच कडवी झुंज देणार असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडी करून डहाणू मतदार संघामध्ये विद्यमान आमदार विनोद निकोले यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे. तर महायुतीकडून डहाणू मतदारसंघात शेवट पर्यंत उमेदवार गुलदस्त्यात ठेवून शेवटी भाजपाकडून विनोद मेढा यांना उमेदवारी घोषित केल्याने पालघर मतदार संघाचे शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचे शेवटच्या क्षणी तिकीट कापत त्यांची गोची केली आहे. त्यामुळे वनगा हे कमालीचे नाराज होत त्यांनी प्रसार माध्यमांना भावनिक होत आपली खंत व्यक्त केली. ते सोमवारपासून नोट रिचेबल असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. त्यामुळे डहाणू मतदार संघात महा युतीकडुन नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. याचा फायदा महाविकास आघाडीला होणार की बहुजन विकास आघाडी यामध्ये बाजी मारणार हे येणाऱ्या निवडणुक निकालात पाहायला मिळणार आहे. बहुजन विकास आघाडी कडून पाडवी यांना उमेदवारी दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. पाडवी यांनी पालघर लोकसभा तसेच डहाणू विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांचा डहाणू मतदार संघामध्ये चांगला जनसंपर्क असून त्यांचा त्यांना या निवडणुकीमध्ये फायदा होत असल्याचे बोलले जात आहे. तर या मतदारसंघांमध्ये निकोल हे दबंग आमदार म्हणून त्यांनी स्वतःचा ठसा उमटवलेला आहे. तर गेल्या अनेक वर्षापासून भाजपाला तळागाळात पोहोचवण्याचे काम केलेले विनोद मेढा यांना उमेदवारी दिल्यावर पक्षात एकनिष्ठेला स्थान दिला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेस बहुजन विकास आघाडी कोणत पावलं उचलते हे सुद्धा पाहणं तेवढेच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र असं असलं तरी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी पालघर मध्ये पाच विधानसभा मतदार संघामध्ये आपले उमेदवार उभे करून महाविकास आघाडी व महायुती यांना मोठं राजकीय आव्हान दिलेले आहे.
Post a Comment