नवी मुंबईतील विमानतळास दि. बा. पाटील यांचे  नाव द्यावे...

      मुख्यमंत्र्यांचे विमानचालन विभागास पत्र 


डोंबिवली ( शंकर जाधव  )

    आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाच्या वतीने नवी मुंबईतील नियोजित विमानतळास लोकनेते  दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी शासनाकडे केलेल्या मागणीस यश आले आहे. या मागणीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले होते.मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत विमानचालन विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात सुरुवात केली असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते संतोष केणे यांनी दिली.

     महासंघाच्या वतीने सातत्याने लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळास देण्यात यावे यासाठी पाठपुरावा सुरु आहे. दि.बा.पाटील यांनी आपल्या अलौकिक कार्याद्वारे लोकप्रियतेची मोहर उमटविली आहे.नवी मुंबई येथील प्रकल्पाग्रस्तासाठी व भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी दि.बा.पाटील यांचे योगदान अतुलनीय आहे.राजकीय कारकीर्द तळागाळातील लोकांसाठी वेचली आहे. मुख्यमंत्री  फडणवीस यांनी महासंघाने दिलेल्या मागणीचे निवेदन विमानचालन विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे योग्य कारवाईसाठी पाठविले आहे. लवकरच या मागणीवर शिक्कामोर्तब होऊन लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळास देण्यात येईल. लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात येईल.लोकनेते दि. बा.पाटील यांचा जन्म १३ जानेवारी १९२६ रोजी रायगड जिल्ह्यातील जाईस गाव येथे झाला. दि.बा.पाटील हे तेथील पहिले वकील होते. दि.बा. पाटील हे फक्त नवी मुंबईच नव्हे तर राज्यपातळीवर पाच वेळा आमदार, दोन वेळा खासदार आणि एकदा विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते अशी मोठी राजकीय कारकीर्द होती.दि.बा.पाटील हे महाराष्ट्र प्रकल्प ग्रस्त समितीचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र नॅॅॅॅशनल आणि बॅॅक्कड क्लास युनियनचे अध्यक्ष होते. २७ गावाच्या संघर्ष समितीच्या लढ्याचे ते अध्यक्ष होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळ ते मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमल अशा अनेक पातळ्यांवर त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे असे कॉंग्रेस प्रवक्ते संतोष केणे यांनी सांगितले.आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाच्या वतीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीयविमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना १० जून २०१८ रोजी निवेदन देण्यात आले होते.त्यानंतर अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासंदर्भातले पत्र १९ जून रोजी दिले होते. सदर पत्राची दाखल घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी विमानचलन विभागाला पत्र दिले.


Post a Comment

Previous Post Next Post