"भिंत खचली...चूल विझली...होते नव्हते नेले... प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले"

सुरुवात होत असतानाच झाला त्यांचा  संसार उध्वस्त


टिटवाळा -:  ( अजय शेलार ) मांडा टिटवाळा पश्चिम भागात वासुंद्री रोडवरील असलेल्या मराठे चाळीतील एक घर शुक्रवारी रात्रीभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शनिवारी पहाटे चारच्या दरम्यान कोसळले. यात  झोपेत असलेले एक दांपत्य  जखमी देखील झाले आहेत  नुकतेच लग्न झालेल्या या दांम्पत्याचं यात मोठं नुकसान झालं आहे. संसाराची सुरुवात होत असतानाचा कालच्या मुसळधार झालेल्या पावसात कोलमडून पडलेल्या घराच्या भिंती उघड्यावर पडलेला संसार  यामुळे सुरुवात होत असतानाच झाला त्यांचा  संसार उध्वस्त  झाला आहे.

शुक्रवारी सकाळपासून सर्वत्रच जोरदार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली  होती. परंतु सायंकाळी या पावसाचा जोर अधिकच वाढत गेला. यामुळे सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यादरम्यान रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे मांडा येथील वासुंद्री रोड लगत असणाऱ्या मराठे चाळीतील बाजीराव घोडे यांचे घर अचानक शनिवारी पहाटे चारच्या सुमारास कोसळले. सदर घरात घोडे यांचा मुलगा किरण घोडे (३१) नुकताच लग्न करून आपली पत्नी कविता घोडे (२३)हिच्यासह तेथे राहत होता. या अपघातात  हे दोघे  पती-पत्नी जखमी झाले आहेत. सुदैवाने ते  बचावले अन्यथा क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले असते.  वैद्यकीय उपचार करून ते घरी आले असून आपले वडिल बाजीराव घोडे यांच्याकडे सध्या राहत आहेत.  या पद्धतीमुळे त्यांचे सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घराचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.हातावर पोट असणाऱ्या किरणचे सर्वस्वच उध्वस्त झाले आहे. त्याने आणि त्याच्या पत्नीने काडी काडी गोळा करून नुकताच उभा केलेला संसार असा उध्वस्त झालेला पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते. 

  
त्यामुळे यात घराचे नुकसान झालेल्या किरण घोडे या आपत्तीग्रस्त तरुणावर  "भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले" असेच म्हणण्याची वेळ आली आहे.  शासनाने सहानभूती पूर्वक आमचा विचार करून आम्हाला उभं राहण्यासाठी सहकार्य करावं अशी अपेक्षा  घोडे कुटुंबाने शासनाकडे केली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post