पालघर (निलेश कासट चीफ ब्युरो)
पालघर तालुक्यातील मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने सर्पदंश झालेल्या मुलीचा उपचाराअभावी शनिवारी (ता.३ )रात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उर्मिला उमेश उमतोल (वय वर्षे ५ )असे मयत मुलीचे नाव असून ती वरई गावच्या उमतोल पाड्याची रहिवासी होती.शनिवारी सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास उर्मिला घर बांधकामासाठी आणलेल्या विटांच्या ढिगाजवळ खेळत होती.त्यावेळी तीने उजव्या हाताच्या बोटाला चावल्याची माहिती तिच्या वडिलांना दिली.
नंतर तासाभरात तीला रिक्षाने मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.परंतु ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने उपचार होऊ शकत नसल्याचे कारण सांगून तिला उपचारासाठी दुसरीकडे नेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर उर्मिला ला मनोरच्या सह्याद्री आणि नंतर आस्था हॉस्पिटलमध्ये नेले असता उपचाराआधीच तीचा मृत्यू झाला होता.
ग्रामीण रुग्णलयामध्ये डॉक्टर नसल्या कारणाने सहा वर्षीय निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागला , राजकीय पुढारी आपली पोळी भाजण्यात मग्न असून त्यांनी आरोग्य सेवेच्या बाबतीत जातीने पाठपुरावा करण्याची गरज आहे. तीस खाटांच मनोर ग्रामीण रुग्णालय आणि एक पण डॉक्टर नाही हा चिंतेचा विषय आहे. लवकरात लवकर डॉक्टर ची सुविधा व्हावी असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
Post a Comment