माजी आमदार सुभाष भोईर यांची कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती

डोंबिवली ( शंकर जाधव )


हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कल्याण लोकसभा मतदार संघाच्या संपर्कप्रमुख पदी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यलायातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे संपर्कप्रमुख करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.


          सुभाष भोईर हे सन २०१४ मध्ये कल्याण ग्रामीण मतदार संघातून शिवसेना पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले होते. तत्पूर्वी ते ठाणे महापालिकेमध्ये मुंब्रा विभागातील विविध प्रभागातून सलग २७ वर्षे नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करीत होते. ठाणे महापालिकेचे चार वेळा विरोधी पक्ष नेते, शिक्षण मंडळ अध्यक्ष, सिडको संचालक व महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांनी अतिशय यशस्वीरीत्या भूमिका बजावलेली आहे.


          आमदार झाल्यानंतर पक्ष संघटना वाढविण्याच्या दृष्टीकोनातून त्यांची परभणी व हिंगोली जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे पक्ष संघटनेचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यात कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेना पक्षाची ध्येय धोरणे, विविध उपक्रम व पक्षाला बळकटी देण्यासाठी सुभाष भोईर यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे. कल्याण लोकसभेच्या संपर्कप्रमुख पदी संधी दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांचे कल्याण लोकसभा क्षेत्रातील  सर्व पदाधिकारी, शिवसेना, युवासेना, युवतीसेना, महिला आघाडी, इतर सलंग्न संघटना व शिवसैनिकांच्या वतीने माजी आमदार सुभाष भोईर यांनी आभार व्यक्त केले आहे. कल्याण लोकसभा क्षेत्रातील स्थानिक कार्यकर्त्याला संपर्कप्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल लोकसभा क्षेत्रातील आगरी कोळी व स्थानिक भूमिपुत्रांनी देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post