परिवहन महाव्यवस्थापकाकडून २०१८ -१९ साठी आर्थिक अर्थसंकल्प सादर
डोंबिवली :(शंकर जाधव ) परिवहन महाव्यवस्थापक मारुती खोडके यांनी २०१८-१९ साठीचा ४ कोटी ३० लाख शिलकीचा अर्थसंकल्प सभापती सुभाष म्हस्के यांच्याकडे सादर केला. प्रत्यक्ष खर्च आणि उत्पन्नाच्या वाढविलेल्या बाबीचा या अर्थसंकल्पात समावेश करत व्यवस्थापक मारुती खोडके यांनी ९७ कोटी ८८ लाख जमा आणि ९३ कोटी ५८ लाख खर्चाचे अंदाज पत्रक मांडले.परिवहन सदस्य यावर चर्चा करून अंतिम बजेट स्थायी समितीला सादर करणार आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेचा परिवहन विभाग पालिका प्रशासनासाठी पांढरा हत्ती ठरला असून उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्यामुळे परिवहनचा डोलारा सांभाळताना पालिका प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत मात्र तरीही नागरिकाच्या सोयीसाठी बसेस चालविण्याचे दिव्य पालिका प्रशासनाला पार पाडावे लागत आहे. परिवहनकडे सद्यस्थितीत ११८ बसेस असल्या तरी यातील ६५ बसेस रस्त्यावर चालत असून उर्वरित ५३ बसेस बंद पडल्यामुळे आगारात उभ्या आहेत. या बसेस मधून दररोज सुमारे ६ ते ७ लाख रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र या बसेस मागील अनेक महिन्या पासून बंद असल्यामुळे मागील वर्षी परिवहनला १७ कोटी ९८ लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले होते या आर्थिक वर्षात या ५३ बसेस रस्त्यावर उतरवून त्याद्वारे परिवहनचे उत्पन्न ३३ कोटी ७७ लाख म्हणजेचे दुपटीने वाढविण्याचे उद्दिष्ट परिवहन कडून ठेवण्यात आले असून याखेरीज शहरात बस थांबे आणि निवारे यांच्यावरील जाहिरातीतून यंदा परिवहनला १ कोटी ५७ लाख रुपये, पोलिसाच्या वाहतुकीद्वारे थकीत ३ कोटी २९ लाख वसूल करण्या बरोबरच ४० लाख यंदा अशी ३ कोटी ६९ लाख रुपये, मुदत ठेवी ३० लाखाच्या, डीझेल साठी जमा ६ कोटी, सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समाभासाठी दिल्या जाणाऱ्या बसेस मधून ६ लाख, आणि महापालिकेकडून महसुली खर्चासाठी ३५ कोटी तर भांडवली खर्चासाठी ७ कोटी रुपयाची मागणी करण्यात आली आहे. एकूनच या सर्व मार्गाने परिवहनला ९७ कोटी ८८ लाख रुपयाचे उत्पन्न यंदाच्या आर्थिक वर्षात अपेक्षित आहे. तर परिवहन कर्मचार्यांना यंदा पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ द्यावा लागणार असून यामुळे खर्चात १८ टक्के वाढ होणार आहे. याखेरीज १७ टक्के महागाई भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ द्यावी लागणार असून यासाठी वर्षभर २५ कोटी ८१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान म्हणून १ कोटी १० लाख आणि सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी ५ कोटी खर्च करावे लागणार आहेत. तर बसेसची देखभाल दुरुस्ती, मेटेनन्स, वार्षिक देखभाल, आणि दुरुस्तीची थकीत देणी यासाठी १४ कोटी ८३ लाख खर्च यंदा अपेक्षित आहे. तर बसेससाठी लागणाऱ्या इंधनावर १६ कोटी ७५ लाख रुपयाचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

Post a Comment