जादा भाडे घेणाऱ्या रिक्षाचालकांची स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा 


 वाहतूक पोलीस आणि आरटीओ कानावर हात

 (डोंबिवली प्रतिनिधी - शंकर जाधव ) डोंबिवली पश्चिमेकडे २ रुपयांनी जादा भाडे वाढ केल्याने प्रवाश्यांची होत असलेल्या लुटीबाबत प्रसारमाध्यमांनी झोड घेतल्यावर वाहतूक पोलीस आणि आरटीओ ( उपप्रादेशिक परिवहन विभाग ) ने गुरुवारपासून अश्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरु केली आहे. मात्र रिक्षाचालक भाडेवाढीवर कायम असल्याने रिक्षा युनियनने रिक्षाचालकांच्या भूमिकेला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला असल्याचे बोलले जात आहे.तर जादा भाडे घेणाऱ्या रिक्षाचालकांची स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा असे आवाहन करून  वाहतूक पोलीस आणि आरटीओ कानावर हात ठेवले आहेत.

  डोंबिवली पश्चिमेकडे रिक्षाचालकांनी स्वयंघोषित रिक्षा भाडेवाढ केल्याचे फलक लावल्यात आले होते. वृत्तपत्रांनी याची दाखल घेतल्याने सदर फलक हटवण्यात आले असले तरी दरवाढ कायम आहे. गुरुवारी डोंबिवली वाहतूक पोलीस निरीक्षक एस.एन. जाधव यांच्यासह कर्मचारी आणि आरटीओ विभागाचेअधिकारी यांनी डोंबिवली पश्चिमेकडील रिक्षाथांब्याची पाहणी केली. मात्र फलक नसल्याने नेमके कोणाला जाब विचारणार असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला होता. कोणतीही भाडेवाढ केली नसून प्रवाश्यांनी जादा भाडे देऊ नये, जादा भाडे घेणाऱ्या रिक्षाचालकांची स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा असे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे. दरम्यान कोणतीही परवानगी नसताना जादा रिक्षा भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर त्या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र प्रवाशी अश्या किती रिक्षाचालकांविरोधात तक्रार दाखल करतील आणि त्यांच्यावर कारवाई होईल का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होते आहे.

Post a Comment

Previous Post Next Post