गांधी जयंतीनिमित्त बापूंविषयी बोलू काही ... - अॅड. जयेश वाणी 

खरं तर एखाद्या शिवसैनिकाने गांधी जयंतीला गांधींविषयी काही लिहायला घेतलं तर भुवया उंचावल्या जाणं स्वाभाविक आहे, पण अशी गांधीविषयीची भुमिका असणं विसंगत नाही. तसं बघितलं तर आम्ही जातीविरहीत समाज मानणा-या बाबासाहेबांचे आणि स्वयंप्रेरणेने जगणा-या नेताजी सुभाषचंद्र बोसांचे वैचारीक वारस आहोत. पुणे करारा वरुन बाबासाहेबांचे आणि कॉंग्रेस अध्यक्षपदावरुन सुभाषबाबुंचे गांधीजींशी मतभेद असुनही त्यांनी कधी गांधींच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाविषयी शंका उपस्थित केली नाही. वैचारीक मतभेदांना वैयक्तिक द्वेशातुन जोपासलं नाही, बघितलं नाही. गांधींचे अतिटोकाचे अहिंसेचे प्रयोग एक शिवसैनिक म्हणुन, मला अमान्य असले तरी गांधीच्या सत्याच्या प्रयोगाचा मी निस्सीम फॅन आहे. 

सध्या देशात सगळीकडे सकाळ पासुन रात्री पर्यंत, अमदाबाद पासुन लाल किल्यापर्यंत, #बोफोर्स_चा_बाप राफेल पासुन IL&FS पर्यंत, चोक्सीपासुन माल्या पर्यंत, राम मंदिरापासुन दाऊद पर्यंत, पेट्रोलच्या ३० रुपये भावा पासुन कलम ३७० पर्यंत असत्याचे प्रयोग सुरु असतांना या काळ्या फळ्यावर म.गांधी हे नाव पांढ-या खडुतील अक्षरा सारखं उठावदार दिसतं.

गांधी जयंतीला खरं तर गांधीं कडून काही घ्यावं, त्यांना काही सांगावं, त्यांना काही विचारवं. गांधींकडून पराकोटीचा प्रामाणिकपणा घ्यावा, देशात वाढणारी अधीरता त्यांना सांगावी आणि विचारावं की तुम्ही ज्या राज्यात जन्माला आलात, जिथे सरदार पटेलांसारखा सच्चा वारस निर्माण केलात ते राज्य तुमच्या आणि सरदार पटेलां नंतर वांझोटं का झालं? विश्रवा ऋषींच्या घरी रावणाने जन्म घ्यावा असं चित्र का निर्माण झालं?

खरं तर तुमची आणि विश्रवा ऋषींची चुकच नाही. तुम्ही तर देत गेलात, त्याग करत गेलात, संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करत गेलात,  माती चांगलीच आहे पीक नासकं निघालं तर दोष शेताचा थोडाच असतो. आता पुन्हा शेत नांगरायची वेळ आलीय बापु, आम्हाला वृषणाचं बळ द्या लोकशाहीचा नांगर फिरवण्यासाठी, आम्हाला शक्ति द्या तुमच्या ३  फुट काठीतली सत्य स्विकारायची आणि सांगण्याची सुध्दा... आम्हाला गरज आहे तुमच्या "उभं रहाण्याच्या" हिमतीची राष्ट्रनिर्मितीसाठी. तुम्ही आम्हाला अमान्य असाल पण आम्ही तुमच्यातला शांतीदुत, करुणासागर, सच्चा देशभक्त अमान्य करुच शकत नाही. तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे आज तुमची जयंती साजरी करताहेत हा तुमचाच विजय आहे. नथुरामच्या माथेफिरुपणाचा गौरव करणा-यांच्या माना आज तुमच्या समोर नतमस्तक होताहेत.बापु २-४  गोळ्यांनी तुमच्या पिंजर शरीराची चाळण करणं सोपं आहे पण तुमचे डोळे आजही अस्वस्थ करतात, तुमच्या दात पडलेल्या कवळीतुन डोकावणारं निरागस हास्य विचलीत करतं माझ्यातल्या आक्रस्ताळीपणाला, मला लाज वाटते कधी कधी स्वत:चीच की मी तुमच्या देशात जन्मलो, म्हणुन तर तुमच्या तस्वीरी ऐवजी मी तुमचे डोळे नसलेला चष्मा वापरतो सगळीकडे प्रतिक म्हणुन कारण ७० वर्षांनंतरही माझ्यात हिंमत नाहीय तुमच्या डोळ्यात डोळे घालुन मी सच्चा भारतीय आहे हे सांगण्याची.

बापु तुम्हाला अभिवादन... 
मला तुमच्या सारखं करा नं प्लिऽऽज...
 - अॅड. जयेश वाणी

Post a Comment

Previous Post Next Post