राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आपसात भिडले...
( डोंबिवली प्रतिनिधी : शंकर जाधव )
देशाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महात्मा गांधी जयंतीदिनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आपसात भिडले.डोंबिवलीत घडलेल्या या घटनेची कार्यकर्त्यामध्येच नव्हे तर नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी बघ्याची भूमिका घेतली होती. कल्याण-डोंबिवलीत आधीच राष्ट्रवादीला घरघर लागली असताना या घटनेवर वरिष्ठ नेते या पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई करतील असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. महात्मा गांधी जयंतीदिनी डोंबिवली पश्चिमेकडील पु. भा. भावे सभागृहासमोर महात्मा गांधी उद्यानात महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे बॅनर लावले होते. त्यानंतर गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर धरणे आंदोलन बसल्यासाठी पदाधिकारी एकत्र आले होते. मात्र त्यावेळी आपला फोटो झळकावा म्हणून सर्वात पुढे कोण बसणार यावर माजी जिल्हा कार्याध्यक्ष विलास म्हात्रे आणि माजी शहर कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर यांच्यात जोरदार वाद सुरु झाला. प्रोटोकॉल नुसार कोण पुढे बसणार यावरून सुरु झालेल्या वादात दोन्ही पदाधिकाऱ्यांनि एकमेकांना धक्काबुक्की केली. याचे पर्यावसन मारामारीत होऊ नये म्हणून काही पदाधिकारी मध्ये पडले.मात्र यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी बघ्याची भूमिका निभावली. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते धरणे आंदोलनाला बसले. मात्र विलास म्हात्रे यांनी एका बाजूला उभे राहणे पसंत केले. याबाबत जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
Post a Comment