बॅनर फाडले कोणी, उतरवले कोणी ?
  सेना-भाजपा कार्यकर्त्यांत संभ्रम

  डोंबिवली :- ( शंकर जाधव ) डोंबिवली मार्गे तळोजा मेट्रो प्रकल्प हा आता चर्चेचा विषय झाला असून हा प्रकल्पला नेमके कोणामुळे यश आले असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे. एकीकडे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. तर दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली असल्याचे सांगत आहे. या कामांचे श्रेय घेणारे बॅनर दोन्ही मित्र पक्षांनी शहराच्या विविध ठिकाणी लावले होते. मात्र भाजपचे फाडलेले बॅनर आणि शिवसेनेने लावलेले बॅनर कोणी उतरविले असा प्रश्न सेना-भाजपा कार्यकर्त्यांना पडला आहे.


    कल्याण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या कामांचे रिमोट द्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण - तळोजा मेट्रो डोंबिवली पर्यत विस्तार करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर कल्याण लोकसभा मतदार संघाचे मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी याबाबत यापूर्वीच मंजुरी मिळाली असून आता या मार्गात बदल करणार का असा प्रश्न भाजपला विचारला आहे.डोंबिवलीकरांना खुश करण्यासाठी भाजपने शहरात सदर कामांचा शुभारंभ होणार असल्याचे अभिनंदनाचे बॅनर लावले आहेत. मात्र डोंबिवली पूर्वेकडील ताई-बाई पिंगळे चौकातील भाजपचे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडले. तर गुरुवारी शिवसेनेने मेट्रोबाबत केलेल्या पाठपुराव्याचे पत्र असलेले बॅनर शहरात ठिकठीकाणी लावलेले होते.मात्र काही तासांतच शिवसेनेचे हे बॅनर उतरविण्यात आले. हे बॅनर कोणी उतरविले असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. याबाबत शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांना विचारले असता ते म्हणाले, डोंबिवलीकरांना सत्य समजावे म्हणून शिवसेनेने यासंदर्भातील बॅनर लावले होते. मात्र हे सत्य डोळ्याला खुपणाऱ्याने आमचे बॅनर काढले असावेत. जे कृत्य ज्यांनी केले आहे त्यांना शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर देऊ.तर  भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा कल्याण लोकसभा विस्तारक शशिकांत कांबळे यांना विचारले असता ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी अनेक प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले आहे. डोंबिवली – तळोजा मेट्रो मार्ग अशी घोषणा केल्याने भाजपने अभिनंदनाचे बॅनर लावले होते. मात्र हे बॅनर ज्यांनी कोणी फाडले आहेत, त्यांच्यावर संस्कार झाले नसल्याचे यावरून दिसून येत आहे. भाजपचे हे बॅनर ज्यांनी फाडले आहेत, त्यांना भाजपा शोधून काढील.
     दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष व शिवसेनेचे शहरप्रमुख अनभिज्ञ....
भाजपचे अभिनंदनाचे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडले आहे, याबाबत डोंबिवली शहरअध्यक्ष संजीव बिरवडकर आणि शिवसेनेचे पाठपुरावा केलेल्या पत्राचे बॅनर कोणी उतरविले याबाबत डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे हे अनभिज्ञ असल्याने कार्यकर्त्यामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकाराची शहरात सर्वत्र चर्चा रंगली असताना दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी माहिती घेणे आवश्यक होते. पक्षाच्या बैठकीत हा विषय चर्चेला येणार असून हे दोन्ही पक्ष याबाबत काय भूमिका घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  
  

Post a Comment

Previous Post Next Post