विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या गोष्टीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा फार मोठा सहभाग
--- जेष्ठ अणु शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर
डोंबिवली : ( शंकर जाधव ) झपाट्याने वाढणाऱ्या तंत्रज्ञानाचे जग होत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या गोष्टीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा फार मोठा सहभाग आहे. चांगल्या आणि वाईट गोष्टींचा वेग वाढतांना दिसून येत आहे. भारताच्या संविधानात भारतीय नागरिकांची काही मुलभूत कर्तव्य अंतर्भूत केली आहेत. त्या कर्तव्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे, सांभाळणे हे मुलभूत कर्तव्य म्हणून नमूद केले आहे. आपण सगळे भारतीय नागरिक संवीधानाशी बांधील आहोत. देशात बरेच वाद निर्माण होत असतात. प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य नमूद असून हा प्रश्न प्रत्येकाला विचारला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे आणि प्रवृत्त करणे हे प्रथम कर्तव्य आहे असे प्रतिपादन जेष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी डोंबिवलीत केले.
स.वा. जोशी विद्यासंकुलात दोन दिवसाचे विज्ञान संमेलन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी डॉ. काकोडकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर विनिता राणे, आयुक्त गोविंद बोडके, डॉ. उल्हास कोल्हटकर, दा. कृ. सोमण आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. काकोडकर पुढे म्हणाले, देश मोठा आहे आणि समस्याही तितक्याच मोठ्या आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत देशात बऱ्याच अशा गोष्टी घडल्या. त्यामुळे आपली प्रगती कमी आणि अधोगती जास्त झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपणच आपले भाग्य विधाते आहोत. बऱ्याच गोष्टी चांगल्या घडल्या आहेत. आपली अर्थव्यवस्था सतत सुधारत आहे. आज भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था असून अभिमान वाटणारी अशी गोष्ट आहे. प्रत्येक भारतीयांच्या जीवनमानावर किती प्रभाव पडला, सरासरी भारतीयांचं जीवनमान आहे ते जगातल्या नागरिकांच्या सरासरी जीवनमानेच्या तुलनेत कसं आहे याचा विचार केला तर आपल्याला जाणवेल कि आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. म्हणून देशांच्या क्रमवारीत स्वास्थ, शिक्षण तसेच इतर एकत्रित विचार केला तर भारताचा क्रमांक खूप वर राहतो. पण जर प्रत्येक व्यक्तीचा विचार करतो तेव्हा आपला क्रमांक खूप मागे असल्याचे दिसते. आपल्या पुढचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे सरासरी भारतीयांचं जीवनमान. जागतिक सरासरीपेक्षा आपण पुढे जाऊ का ? सर्वात उन्नत असणाऱ्या दहा देशात भारताचा क्रमांक लागेल का ? या दृष्टीने आपली आव्हाने ठरवावी लागतील. विज्ञानाची कास धरून आवश्यक ती वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती साध्य करून त्यामध्ये जगाच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणे आवश्यक आहे. आजचे जग अत्यंत स्पर्धात्मक आहे. स्पर्धात्मक विचार केला तर भारतातच ग्रामीण आणि शहरी अशी खूप तफावत आहे. ग्रामीण भागातील प्रगती करून संपूर्ण देशाला वर आणणे, भारताची प्रगती करणे, जगाच्या तुलनेत पुढे नेणे हे आव्हान आपण पेलले पाहिजे. आणि ते पेलण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण हा सर्वात महत्वाचा पैलू आहे. आजची शिक्षण प्रणाली काही वर्षांनी कालबाह्य ठरणार असल्याचे डॉ. काकोडकर यांनी शेवटी सांगितले. या प्रसंगी खा.डॉ. श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर विनिता राणे यांची भाषणे झाली.
Post a Comment