आजदेगावची परिस्थिती `इकडे आड तिकडे विहीर'
  पालिका आणि एमआयडीसीचा पाणीपुरवठा करण्यास नकार..
 डोंबिवली :- ( शंकर जाधव  ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत २७ गावे समाविष्ट होऊन चार वर्ष उलटल्यानंतर एमआयडीसी आणि पालिका प्रशासना गावातील पाणी पुरवठा करण्यास चालढकल करत असल्याचे दिसून आले आहे. डोंबिवली शहराजवळ असलेल्या आजदेगावाला पाणी पुरवठा कोण करणार यावर पालिका प्रशासन आणि एमआयडीसी हे एकमेकांकडे बोट दाखवीत आहे. मात्र यांच्या भांडणात येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले असून पालिका आणि एमआयडीसी डोंबिवली विभागीय कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा दिला आहे.
   २० जून रोजी एमआयडीसीने पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना पत्र दिले. आजदेगावासाठी महामंडळाच्या ६०० मी.मी.व्यासाच्या जलवाहिनिवरील ०३ नळजोडण्या  देण्यात आल्या आहेत. आजदेगावाचा पाणीपुरवठा महामंडळाच्या वितरण वाहिन्याच्या शेवटच्या भागात उंचावर असल्याने त्या जागी अपेक्षित दाबाने २४ तास पाणी पुरवठा होऊ शकत नाही.त्यामुळे आपल्या विभागाकडून जनतेच्या अपेक्षित दाबाने पाणी पुरवठा करण्यासाठी पत्राद्वारे मागणी केली जात आहे. तसेच स्थानिक जनतेकडून वेळोवेळी मोर्चा व आंदोलने करण्यात येतात. सद्यस्थिती महामंडळाच्या सद्याच्या पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतून आजदेगावच्या नळजोडण्यांच्या ठिकाणी योग्य दाबाने २४ तास पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही.त्यामुळे याठिकाणी पालिकेने डोंबिवली शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी वरून आजदेगावला पाणी पुरवठा साठी नळजोडणी देण्यात यावी असे पत्रात म्हटले आहे. तर आजदेगाव महामंडळाच्या वितरण वाहिन्याच्या शेवटच्या भागात उंचावर असल्याने त्या जागी अपेक्षित दाबाने २४ तास पाणी पुरवठा होऊ शकत नाही हे समजायला एमआयडीसीला चार वर्ष लागल्याबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ३० जुलै २०१९ रोजी स्थानिक नगरसेवक विनोद काळण यांनी एमआयडीसी डोंबिवली विभागाला पत्र दिले आहे. आजवर आजदेगावाला एमआयडीसीकडून पाणी पुरवठा अनियमित,कमीदाबाने व अपुरा होत असतो. याबाबत आमची तक्रार आहे.परंतु निदान नागरिकांनी किमान गरज पूर्ण होत होती.परंतु गेल्या दीड- दोन महिन्यापासून एमआयडीसी डोंबिवली विभागाचे उपभियांता कुंभार यांनी व्हाॅॅलऑपरेशन मध्ये बदल करून आजदेगावचा पाणी पुरवठा बाधित केला आहे. आता दररोज सकाळी पूर्ण वेळ व संध्याकाळी ५ ते ६ तास असा आजदेगावचे संप मध्ये होणारा पाणी पुरवठा १०० टक्के बंद होतो.या कारणाने संपूर्ण प्रभागातील पाणी पुरवठा बाधित होऊन नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे आजदेगावातील नागरिक आंदोलन करतील असा इशारा या पत्रात दिला आहे. तसेच ३१ जुलै रोजी पालिका प्रशासनालाही पत्र दिले आहे. याबाबत जलअभियंता पालिकेचे राजीव पाठक यांना  विचारले असता ते म्हणाले,एमआयडीसीने पालिकेला पत्र देऊन आपल्या जबाबदारीतून हात वर केले आहेत. परंतु आजदेगावाला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी एमआयडीसीचीच आहे. सोमवरी यासंदर्भात एमआयडीसी डोंबिवली विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांच्याबरोबर चर्चा होणार आहे. तर उप अभियंता शेलार यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, आजदेगावांना पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने डोंबिवली शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या जलवाहिनीतून जोडणी करावी.तसेच याबाबत एमआयडीसी डोंबिवली विभाग आणि पालिका प्रशासन यांच्यात चर्चा करून आजदेगावासियाना पाणी पुरवठा योग्य दाबाने कसा होईल याकडे लक्ष दिले जाईल

Post a Comment

Previous Post Next Post