राज्यमंत्र्यांच्या दहीहंडी उत्सवात पूरग्रस्तांसाठी २५ लाखांचा निधी




विद्यानिकेतन शाळा, ब्राह्मण महासंघ,उद्योजक सरसावले..
 माजी केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटलींना श्रद्धांजली
डोंबिवली: ( शंकर जाधव ) राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजातील विविध घटकांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन केले होते. त्यानूसार राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गोविंदा पूरग्र​​स्तांच्या मदतीला या संकल्पनेतून शनिवारी दहिहंडी उत्सव संपन्न केला. त्यावेळी गोविंदा पथकांनीही आवर्जून सहकार्य करत पूरग्रस्तांसाठीच्या निधी संकलन कार्यात लाखो रूपयांचे योगदान दिले. चव्हाण यांच्या हाकेला साद देत विद्यानिकेतन शाळा, ब्राह्मण महासंघ, जैन समाज, कासार समाज, हॉटेल व्यावसायिक, ज्वेलर्स असोसिएश, शहर भाजप कार्यकर्ते आदींच्या सहकार्यामुळे संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे २३ लाखांचा निधी उभा राहीला होता. त्यानूसार रात्रीपर्यंत साधारणपणे २५ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी डोंबिवलीकरांचे योगदान निश्चित असेल असे चव्हाण म्हणाले. ठाण्यानंतर जिल्ह्यामध्ये राज्यमंत्री चव्हाण यांची हंडी मानाची अशी ख्याती झाली आहे. त्या हंडीला मुंबई, ठाणे जिल्ह्यांतून सुमारे २०० गोंिवंदा पथक सलामीसाठी आली होती. ५ थर लावायचे आणि त्याचे मानधन घेऊन जायचे असे चव्हाण यांचे धोरण यंदाही कायम होते. त्यातच वरच्या दोन्ही थरांना सेफ्टी बेल्ट लावण्याची अट कायम होती, जे मंडळ ती अट मान्य करणार नाही त्यांना उत्सवात सहभागी न होण्याचे स्पष्ट नियम करण्यात आले होते. त्यामुळे सहभागी मंडळींना नियमांचे पालन करावेच लागले. तसेच जे गोविंदा पथक कायद्याचे उल्लंघन करेल अशा पथकांनाही तातडीने बाजूला करण्यात येईल अशा सूचना आयोजक वेळोवेळी देत होते.
विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी त्यांच्या शाळेची सहल यंदा न काढण्याचा निर्णय घेतल्याचे सर्वश्रुत होतेच. त्यानूसार त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत ५.५ लाखांचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा धनादेश राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना दहीहंडीच्या व्यासपीठावर जाहिरपणे दिला. चव्हाण यांनी शाळा व्यवस्थापन, शिक्षक वृंद, विद्यार्थी या सगळयांचे विशेष कौतुक केले. शालेय जीवनातच पंडित यांनी विद्यार्थ्यांना देशप्रेमाची गोडी निर्माण व्हावी यासाठी खूप मोठे पाऊल उचलले आहे. त्याला अबालवृद्धांनी पालकांनी साथ दिली, त्या सगळयांचे आभार त्यांनी मानले. मुख्यमंत्री फडणवीस यांना विशेष करुन या शाळेसंदर्भात माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. पंडित यांनी मात्र देशकार्य करणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य असल्याचे म्हणत या विषयावर जास्त भाष्य करणे उचित नसून कृती महत्वाची हे दाखवून दिल्याची चर्चा सर्व गोविंदा प्रेमींमध्ये सुरु होती. ब्राह्मण महासंघातर्फेही प्रज्ञेश प्रभुघाटे, मानस पिंगळे आदींसह पदाधिका-यांनी धनादेश दिला.
 याच उत्सवा दरम्यान भारताचे माजी केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त आले. त्यामुळे आयोजक, गोविंदा पथक आणि राज्यमंत्री चव्हाण यांनी उत्सव १० मिनिटांसाठी थांबवला. त्यामध्ये तात्काळ बैठक घेऊन उत्सव पुढे न्यायचा की नाही याची चर्चा केली. त्यावर राज्यमंत्री चव्हाण यांनी पथक अनेक महिने कठीण सराव करतात, त्यांना या कलेतून आनंद मिळतो, आत्मविश्वास वाढतो. यामुळे कोणताही बडेजाव न करता उत्सव सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला. पथकांनीही नियमांचे उल्लंघन न करता पूरग्रस्तांसाठी अर्थसहाय्य करण्याच्या हेतूने हा उत्सव सरु ठेवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल चव्हाण यांचे आभार मानले. त्यानूसार चव्हाण यांच्या आदेशांनूसार भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस, उत्सवाचे सूत्रसंचालक शशिकांत कांबळे यांनी हजारो उपस्थितांना जेटलींना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले. त्यावेळी स्पिकर्स, गाण्यांचा आवाज, अन्य पोंगे, भोंगे वाजवणे, मोबाइल सगळ बंद करण्यात आले होते. तसेच ठरवण्यात आलेले सर्व सांस्कृतिक कार्र्यक्रम देखिल रद्द करण्यात आले होते. त्यासाठी आलेल्या सहभागींनीही चव्हाण यांना सहकार्य करत साथ दिली.

   ७ थर लावण-या पथकांचा विशेष सन्मान....
     यापूर्वी ज्या गोविंदा पथकांनी ७ थर लावले आहेत त्या पथकांना राज्यमंत्र्यांनी प्रत्येकी १ लाख रुपयांचे विशेष पारितोषिक, ट्रॉफी देऊन सन्मानीत केले. त्यामध्ये आत्मविश्वास मित्र मंडळ, ओम साई हनुमान मंडळ, नव सह्याद्री गोविंदा पथक, एम.बी ग्रुप, शिवतेज गोविंदा पथक या पश्चिमेकडील पथकांचा तसेच जय महाराष्ट्र गोविंदा पथक, आयरे गावचा राजा या पूर्वेकडील पथकांचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post