कल्याण डोंबिवली महापालिकेचा स्वच्छ शहरात वरचा क्रमांक यावा तसेच शहर स्वच्छ राहावे यासाठी पालिकेने रात्रीचा कचरा फेकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक केली आहे. या भरारी पथकाने दंड आकारण्यास सुरुवात केली असून शुक्रवारी मध्यरात्री कचरा फेकणार्यांवर कारवाई केल्याचा राग मनात धरून भरारी पथकाला बेदम मारहाण तसेच गाडीची तोडफोड करण्यात आली. जखमी कर्मचाऱ्यांवर उपचार करण्यात आले असून यासंदर्भात राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती राम नगर पोलिस ठाण्यातून देण्यात आली.
शुक्रवारी मध्य रात्री पथक प्रमुख दिगंबर वाघ , संदीप पावशे व अजित खाणे असे दोन कर्मचारी आणि वाहनचालक शरद चोळके कामावर
हजर होते.भरारी पथकाकडून टिळक रोड येथे कचरा फेकणाऱ्यांवर दंड वसूल करण्याचे
काम सुरू होते. यावेळी रमेश राम फकीर पटेल , महेश राम फकीर पटेल , नितीन यादव, अमोल खिलारे या चौघांनी आम्ही दंड भरणार नाही असे सांगत
भरारी पथकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर गाडीची देखील
तोडफोड केली आहे. यासंदर्भात राम नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून भरारी
पथकाला पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी होत आहे. या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत
असल्याची माहिती पालिका सफाई कर्मचाऱ्यांनी दिली. या चौघांवर राम नगर पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्मचाऱ्यांवर उपचार करून त्यांना घरी
सोडण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी देगलूरकर यांनी दिली. तर त्यातील महेश
पटेल, रमेश पटेल आणि अमोल खिलारे या तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती राम
नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.
Post a Comment