देवशयनी आषाढ एकादशी निमित्त जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोलीचे संस्थापक- निलेश सांबरे यांचे सर्वसामन्यांचा देव असलेल्या पाडुरंगाला विठ्ठलाला एक संवेदनशील पत्र ....
बा विठ्ठला नाहीतर ...तुलाच तुझ्या कमरेवरचे हात काढावे लागतील ..... विटेवरुन खाली उतराव लागेल....
विठ्ठला...." देवशयनी आषाढ एकादशी निमित्त अनेक भक्तगण आणि वारकरी तुझ्या दर्शनाला येतील आपली गाऱ्हाणी तुला सांगतील... हक्काने काही मागणे मागतील ..... बा विठ्ठला माझेही तुझ्याकडे असेच एक मागणे आहे ....पण माझे मागणे हे माझ्यासाठी नाही विठ्ठला .... तर माझे मागणे आहे इथल्या माझ्या ठाणे पालघर जिल्ह्यातल्या मातीतल्या कष्टकरी कुणबी शेतकरी, बहुजन,आदिवासी, आगरी कोळी , मुस्लीम, अल्पसंख्यांक गरीब राबणाऱ्या जिवांसाठी माझ्या समाजबांधवांसाठी आहे. या माझ्या जिल्ह्यांतल्या ग्रामीण खेड्यापाड्यात कायापालट व्हावा म्हणून नियुक्त झालेल्या प्रशासकीय अधिकारीवर्गाकडे माझ्या ग्रामीण भागातली भोळी भाबडी जनता मोठ्या आशेने बघते ... पण वर्षानुवर्ष त्यांच्या पदरी निराशाच पदरी पडली. या भागांसाठी येणाऱ्या योजना म्हणजे इथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी आयते कुरण असते. शिक्षण , आरोग्य या सुविधांचा उडालेला बोजवारा ही कथा आमच्या पाचवीलाच पुजलेली पण जिल्हा नियोजन समितीपासुनची इथली सर्वच यंत्रणा मात्र बदली बढतीच्या टक्केवारीतच मशगुल असलेली पाहवयास मिळत आहे. तिळ तिळ मरणारा इथला गरीब हा या भ्रष्ट वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा झापड आलेल्या डोळ्यांना दिसतच नाही त्यांना दिसतो तो फक्त इथल्या दिल्या जाणाऱ्या सर्टिफिकेट आणि औषध पुरवठ्या मधुन खाता येणारा पैसा ... काळी कमाई. जिल्हा नियोजन विभाग उच्च अधिकाऱ्यांचा नावे मोठे मोठे टक्के तसेच N.A.जमिनीसंबंधी RDC, चिटणीस यांची सुद्धा भली मोठी टक्केवारी ऐकायला येते. उच्च अधिकारी आपल्या हाताखालील व्यक्तींना मलाईची जागा देण्यासाठी मोठ-मोठी अर्थीक मागणी करत असतात.
या भागांत योजना आणि निधीतुन पोसली जाणारी बांडगुळ इथल्या भुमिपुत्राला देशोधाडीला लावत आहेत. हे सार सार उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्याना जाग कर विठ्ठला .... नाहीतर येणारी पिढी त्यांच्या वर्तमानाला नख लावणाऱ्यांना कदापी माफ करणार नाही . पिचलेल्या गरीब कष्टकऱ्यांच्या माथ्यावरचे लोणी खरवडुन खाणाऱ्याना सुबुध्दी दे ! आणि जर त्यांना बुद्धी येत नसेल तर ......तुलाच तुझ्या कमरेवरचे हात काढावे लागतील ..... विटेवरुन खाली उतराव लागेल आणि " भले तरी देउ कासेची लंगोटी ... नाठाळाच्या माथी हाणु काठी ....या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे कुठल्या कुठल्या माध्यमातुन यावच लागेल यावच लागेल !!!!
*श्री .निलेश भगवान सांबरे*
*संस्थापक -जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली*
Post a Comment