फाउंडेशन फॉर मदर अँड चाईल्ड हेल्थ संस्थेचा उपक्रम
पथनाट्याच्या माध्यमाने जागतिक स्तनपान सप्ताह होतोय साजरा 



(मुंबई डेटलाईन 24 टीम -कल्याण : अविनाश पाटील) ऑगस्ट महिन्याची सुरुवात स्तनपान सप्ताहाने होत असते. १ ते ७ ऑगस्ट हे दिवस जागतिक स्तरांवर जागतिक स्तनपान सप्ताह म्हणुन साजरा होत असतो जगभरातील १२० पेक्षा अधिक राष्ट्र हा सप्ताह साजरा करत असतात. या स्तनपान सप्ताहाची सुरुवात १९९२ साली झाली आणि प्रामुख्याने जागतिक पातळीवर विविध व्यक्ती, संस्था, संघटनाच्या माध्यमाने स्तनपानविषयक जनजागृती या सप्ताहात केली जाते. स्तनपानविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने फाउंडेशन फॉर मदर अँड चाईल्ड हेल्थ संस्थेने पथनाट्याच्या माध्यमाने भिवंडी निजामपुर महानगरपालिका क्षेत्रांतील एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाड्या, नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात स्तनपान विषयक जनजागृती केली. प्रामुख्याने कापड कारखाने, स्थलांतरित समाज, अपुऱ्या आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध असलेल्या भिवंडी शहरांत अस्वच्छता आणि कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. गरिबी त्याचबरोबर पाणी आणि विजेची मोठी समस्या असलेल्या भिवंडी शहरातील अनेक नागरी वस्ती समुदायात फाउंडेशन फॉर मदर अँड चाईल्ड हेल्थ संस्था माता आणि बालकांच्या पोषण आणि आरोग्य विषयक प्रश्नांवर काम करते. नवजात बालकास जन्माच्या एका तासांत आईचे दूध पाजणे त्याचबरोबर पहिल्या सहा महिन्यापर्यंत फक्त आणि फक्त आईचे दूध पाजणे आवश्यक आहे हा संदेश वस्तीतील स्तनदा माता आणि त्यांच्या कुटुंबाला यावेळी पथनाट्याच्या माध्यमाने देण्यात आला. कुपोषणाचे अधिक प्रमाण असलेल्या काही वस्त्या आणि स्तलांतरित समाजाच्या वस्तीत जावून संस्थेचे वस्ती संघटक स्तनपान विषयक माहिती प्रात्यक्षिकांच्या माध्यमाने लोकांना देत आहेत. स्तनपान हे नवजात बाळाचे पहिले लसीकरण असते त्याचबरोबर आईच्या दुधात बाळाला आवश्यक सर्व पौष्टीक घटक समाविष्ट असतात त्यामुळे बाळाला पाणी, मध किंवा इतर कोणतेही पातळ पदार्थ सहा महिन्यापर्यंत देवू नये असे आवाहन देखील हे वस्ती संघटक लोकांना करत आहेत. पूर्वापार चालत आलेल्या स्तनपान विषयक चुकीच्या सवयी त्याचबरोबर लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर व्हावेत आणि स्तनपान अभावी कोणतेही बाळ कुपोषणाचे बळी पडू नये यांसाठी आमचे हे प्रयत्न चालू आहेत असे यावेळी वस्ती संघटकांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post