टिटवाळ्यातील अभिनव बॅंकेत इनव्हर्टर बॅटरीच्या शॉर्टसरकिटमुळे आग
अग्निशमन केंद्राचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
टिटवाळा :(अजय शेलार ) येथील गणेश मंदिर रोडवर असलेल्या लक्ष्मी नारायण निवासमध्ये असलेल्या अभिनव सहकारी बॅंकेत इनव्हर्टर बॅटरीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्टसरकिटमुळे येथील पावर हाउस जळाले यामध्ये पावर हाउसची केबिनमधील एसी. तसेच इनव्हर्टर जळाले मात्र इतर कुठल्याही प्रकारचे नुकसान अथवा हानी झाली नाही. सकाळी कर्मचारी आल्यानंतर त्यांना सदर घटना कळुन आली. याबाबत टिटवाळा पोलिस स्थानकात आकस्मिक जळीत घटना अशी नोंद करण्यात आली आहे.या लागलेल्या आगीमुळे बॅंकेत अंधार पसरुन सर्व विद्युत उपकरणे, यंत्र बंद पडल्याने दिवसभर येथील कामकाज ठप्प झाले होते.
या घटनेमुळे अग्निशमन केंद्राचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील राष्ट्रवादी कल्याण शहर उपाध्यक्ष विनायक काळण यांनी "महानगरपालिकेकडुन येथे १३ मजली इमारतीना बांधकामासाठी परवानगी दिली जाते . मात्र अश्या इमारतीस आगीसारखी एखादी दुर्घटना घडली तर त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कल्याणच्या अग्निशमन केंद्राशिवाय पर्याय नाही . टिटवाळा शहर हे केवळ कागदोपत्री महानगरपालिकेत आहे. मात्र मुलभुत सुविधे बाबत बोलायचे झाल्यास एखाद्या खेडेगावासारखे चित्र आहे . त्यामुळे तातडीने या ठिकाणी अग्निशमन केंद्र उभारणे गरजेचे आहे" असे सांगितले. तर संभाजी ब्रिगेडचे कल्याण डोंबिवली महानगर अध्यक्ष प्रभाकर भोईर यांनी "बॅंका ,रुग्णालय, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी सतत मोठ्या प्रमाणात लोकांचा समुदाय असतो जर अश्या वास्तुंच्या सुरक्षाच जर अंधारत असतील तर सामन्य लोकांना जिविताचे काय ? या ठिकाणी तातडीने अग्निशमन केंद्राची सुविधा निर्माण व्हायला हवी " असे सांगितले.याविषयी या प्रभागाच्या नगरसेविका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांना विचारले असता " आपण २०११ पासुन अग्निशमन केंद्रासाठी पाठपुरावा करत असुन जागेअभावी हा प्रश्न प्रलंबित होता. काही दिवसांपुर्वी आयुक्तांनी दौरा केल्यानंतर जागेचा प्रश्न मार्गी लागला असुन ५० लाखांचा निधी देखील मंजूर झाला आहे . रिजन्सी परिसरातील जागा यासाठी नियोजित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच या ठिकाणी अग्निशमन केंद्र उभे राहणार आहे. " असे सांगितले.
Post a Comment