ओला – सुका कचरा वेगळा करून द्या अन्यथा कचरा उचलणार नाही ....
पालिका प्रशासन १० हजार सोसायटींना बजावणार नोटीसा....
डोंबिवली :- ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील दरदिवशी साडेसहाशे मेट्रिक टन कचरा आधारवाडी डंपिंग ग्राउंडवर टाकला जातो.मात्र आता या डंपिंग ग्राउंडची क्षमता संपली असून त्यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने नवीन धोरण अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.`ओला – सुका कचरा वेगळा करून द्या,अन्यथा कचरा उचलणार नाही` अश्या प्रकारच्या १५ हजार नोटीसा विविध सोसायटीना दिल्या जाणार आहेत.मंगळवारी जागरूक नागरिक मंच, आमदार नरेंद्र पवार आणि पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी कल्याण येथील आधारवाडी डंपिंग ग्राउंडची पाहणी केली.यावेळी आयुक्त बोडके यांनी अश्या प्रकारच्या नोटीसा दिल्या जाणार असल्याची माहिती दिली.
काही दिवसांपूर्वी कल्याण येथे जागरूक नागरिक मंचाने विविध मागण्यांसाठी उपोषण केले होते. यावेळी आधारवाडी डंपिंग ग्राउंड बंद करून शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट करण्यात यावी अशी प्रमुख मागणी पालिका आयुक्त बोडके यांच्यासमोर मांडली होती. या डंपिंग ग्राउंडवरील एक एकर जमिनीवरील प्लास्टिक वेगळे करण्यासाठी जागरूक नागरिक मंच आणि आमदार नरेंद्र पवार यांनी १० ते १२ कचरावेचक ठेवले आहेत.गेल्या सात दिवसांपासून सुमारे ४० गोणी प्लास्टिक वेगळे केले जात आहे. या ठिकाणी उर्वरित कचऱ्यावर वेस्ट डीकंपोजचा वापर करून समूळ निवारण करण्यासाठी फवारणी करण्यात आली. या ठिकाणची आमदार नरेंद्र पवार, जागरूक नागरीक मंचाचे श्रीनिवास घाणेकर, वंदना सोनावणे, पालिका आयुक्त गोविंद बोडके,घनकचरा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता घनश्याम लवागुळ, घनकचरा व्यवस्थापक विलास जोशी यांनी पाहणी केली. जागरूक नागरिक मंचाच्या वतीने प्रायोगिक तत्वावर सदर प्रकल्प राबविण्यात आला आहे. यावेळी कचरा व्यवस्थापनावर चर्चा झाल्यावर पालिका आयुक्त बोडके यांनी यावर कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध सोसायटींना नोटीसा बजावणार असल्याचे सांगितले. याबाबत घनकचरा प्रकल्प कार्यकारी अभियंता घनश्याम लवागुळ यांनी अधिक माहिती दिली. १० हजार सोसायटींना येत्या १५ तारखेपासून नोटीस बजावण्यात येणार आहे. नागरिकांना या नोटीसद्वारे विनंती केली जाणार आहे.तर जागरूक नागरिक मंचाचे श्रीनिवास घाणेकर म्हणाले, जागरूक नागरिक मंचाने याबाबत आवाज उठविल्यावर झोपी गेलेली पालिका प्रशासनाला जाग आली.दरम्यान अनके सामाजिक संस्था नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहेत. आता पालिकेची हे नवीन धोरण नागरीक स्वीकारतील का याला पाठ दाखवीत हे लवकरच दिसून येईल.
Post a Comment