पार्कातल्या कवितांचा ४५ वा प्रयोग टिटवाळ्यात उत्साहात संपन्न विविधांगी कवितांनी आणली कार्यक्रमात रंगत



टिटवाळा:
  काफ़िला, मुंबई प्रस्तुत पार्कातल्या कविता  या  निसर्गाच्या सान्निध्यात कवितांची हृद्य मैफिल  टिटवाळा येथे संपन्न झाली या कार्यक्रमाचा हा  ४५  प्रयोग होता . उपस्थित सर्वांनीच  कवितांचा सुखद अनुभव घेतला. बगळ्यांची माळ फुले या अजरामर गीताचे गीतकार वा.रा. कांत यांना हा कार्यक्रम समर्पित करण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वच कवींनी विविध पैलू असलेल्या विषयांना  स्पर्श करत आपल्या रचनेतून हा कार्यक्रम बहारदार केला . स्वप्ना कुळकर्णी यांनी आपल्या कवितेतून निसर्गातील अनेक बारकावे कवितेतून  मांडले, तर अरुणा शानबाग  यांच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगावर आधारित कवितेतून माणसातल्या हैवानतेची काळी बाजू समोर आणली.     तर कवी संदीप राउत यांनी आपल्या सुरेल आवाजाने मैफिलीत विशेष रंगत आणली. आई या विषयावर सादर केलेली त्यांची रचना उपस्थितांच्या मनाचा कोपरा हळवा करून गेली . अजय शेलार यांनी सदर केलेल्या कोरा चहा या कवितेने उपस्थितांची दिलखुलास दाद मिळवली .  माधव दिक्षित यांनी आपल्या रोजच्या जीवनात घडणारे प्रसंग कवितेतून मांडत त्यातली विदारकता समर्पक शब्दांत मांडून उपस्थितांची विशेष दाद मिळवली. सुनील खांडेकर यांनी सादर केलेली गजल त्यातील शेर पुन्हा पुन्हा दाद घेऊन गेली , प्रशांत वैद्य यांच्या "केवळ कोठे प्राजक्ताचे राज्य खालसा होते." या शेरवर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या कार्यक्रमाची संकल्पना-सूत्रधार असलेल्या स्वरूपा सामंत, विजय उतेकर यांनी स्थानिक कवींना या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळावे आणि साहित्यिक चळवळ त्या त्या भागांत सक्रीय रहावी हा या पार्कातल्या कवितांच्या कार्यक्रमा मागचा उद्देश असल्याचे सांगितले .  सदानंद बेंद्रे यांनी या  कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन करत अनेक दिग्गज कवींच्या कविता सादर करत मैफिलीत रंग भरले 

 प्राजक्तांच्या फुलांचा ओघळ, बहरलेली गूलबाक्षी,  सदिच्छा बंगल्याच्या पार्कमध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात अंगणातील छोटीशी मोहक बाग दर्जेदार गझलकार आणि कवीची उपस्थिती आणि त्यांच्या सादर केलेल्या रचना यांनी  या कार्यक्रमास चार चांद लावले.. विजय उतेकर ह्यांनी कवी वा.रा.कांत ह्यांच्या सुंदर सादर केलेल्या कविता आणि स्वप्ना दीक्षित यांचे उत्तम नियोजन यामुळे पार्कातल्या कविता हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post